नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत गेल्या काही आठवड्यांत स्वाइन फ्लू म्हणजेच H1N1 संसर्गाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने सार्वजनिक आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना जारी करून नागरिकांना श्वसनविषयक संसर्गापासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, नियमितपणे हात धुणे, श्वसनविषयक संसर्ग असलेल्या व्यक्तींच्या जवळचा संपर्क टाळणे आणि फ्लूसदृश लक्षणे गंभीर असल्यास किंवा दीर्घकाळ कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, यावर्षी दिल्लीत H1N1 चे १,७७७ हून अधिक रुग्ण आढळले आहेत. एकट्या गुरुवारी ११४ नवीन रुग्णांची नोंद झाली. राजधानीत इन्फ्लुएंझा-A चे २,३०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने खबरदारीच्या उपाययोजना अधिक तीव्र केल्या आहेत.जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये खोकताना किंवा शिंकताना नाक आणि तोंड झाकण्याचा तसेच गर्दीच्या किंवा कमी हवेशीर ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.नागरिकांनी नियमितपणे हात धुवावेत आणि हात न धुता डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळावे, असेही सांगण्यात आले आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळणे, श्वसनविषयक लक्षणे असलेल्या व्यक्तींपासून अंतर ठेवणे, पुरेसे पाणी पिणे आणि आजारी असताना अनावश्यक जवळचा संपर्क टाळणे, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.


















