सातारा : यंदाच्या ऊस गळीत हंगामात पुणे विभागातील साखर कारखान्यांनी आघाडी घेतली आहे. विभागात २,२५,१६,६४४ टन उसाचे गाळप झाले असून, २,२२,२४,१८० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर विभागाचा सरासरी उतारा ९.८७ टक्के इतका राहिला. विभागातील ३२ कारखान्यांनी गाळप केले असून त्यात १८ सहकारी व १४ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. सहकारी कारखान्यांनी सर्वच आघाड्यांवर बाजी मारली आहे.महाराष्ट्राच्या साखर उद्योगात पुणे व सातारा या जिल्ह्यांचा मोठा वाटा आहे. गेल्या काही वर्षांत साखर कारखान्यांचा कल साखर उत्पादनापेक्षा इथेनॉल निर्मितीकडे वाढताना दिसत आहे. लाखो लिटर क्षमतेचे इथेनॉल प्रकल्प उभारण्यात आले असून, हे इथेनॉल सरकारी इंधन कंपन्यांना विकले जात आहे.
यंदा पुणे जिल्ह्यातील १५ कारखान्यांनी १,१६,४८,९३३ टन उसाचे गाळप करून १,१४,२६,६१० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. जिल्ह्याचा सरासरी उतारा ९.८१ टक्के राहिला. तर सातारा जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी १,०८,६७,७११ टन उसाचे गाळप करून १,०७,९७,५७० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. जिल्ह्याचा सरासरी उतारा ९.९४ टक्के राहिला. सातारा जिल्ह्यातील खासगी साखर कारखान्यांनी ५२ लाख ७३ हजार १५५ क्विंटल साखर निर्मिती केली आहे. तर सहकारी कारखान्यांनी ५५ लाख २४ हजार ४१५ क्विंटल साखर उत्पादन घेतले. पुणे जिल्ह्यातील सहकारी कारखान्यांनी ७५ लाख २४ हजार ३३२ क्विंटल साखर तयार केली. तर खासगी कारखान्यांनी ३९ लाख २ हजार २७८ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. दरम्यान, साखर कारखान्यांकडून होणाऱ्या इथेनॉल निर्मितीमुळे साखरेच्या उताऱ्यावर किती परिणाम होतो, याची अधिकृत माहिती कारखान्यांकडून दिली जात नसल्याच्या तक्रारी आहेत. परिणामी, केवळ साखर उत्पादनावर आधारित उताऱ्याच्या गणनेवर एफआरपी ठरवली जात असल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे.


















