नवी दिल्ली : ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या इथेनॉल पुरवठा वर्षात १,०४८ कोटी लिटर इथेनॉलचा करार झाला आहे, त्यापैकी जूनपर्यंत ७१७ कोटी लिटरचा पुरवठा झाला आहे. हे उद्दिष्टाच्या ६८ टक्के आहे. एकूण पुरवठ्यापैकी ४८० कोटी लिटर धान्य-आधारित आहे, तर २३८ कोटी लिटर ऊस-आधारित स्रोतांकडून आले आहे. खराब झालेल्या अन्नधान्यापासून ४५० दशलक्ष लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले आहे. यातून भारताचा इथेनॉल मिश्रण कार्यक्रम वेगाने ऊस-आधारित मॉडेलकडून मका आणि इतर धान्यांकडे वळत असल्याचे दिसून येते. जूनअखेर तेल विपणन कंपन्यांना पुरवठा झालेल्या इथेनॉलमध्ये ६७ टक्के इथेनॉल धान्य-आधारित असून, त्यात उसाचा वाटा ३३ टक्के आहे. तर एकट्या मक्याचे उत्पादन २५८ कोटी लिटर झाले, जो सर्वात मोठा वाटा आहे.
देशभरात मक्यापासून २५८ दशलक्ष लिटर, एफसीआयच्या अतिरिक्त अन्नधान्यापासून १७७ दशलक्ष लिटर, उसाच्या रसापासून १४४ दशलक्ष लिटर, बी-हेवी मळीपासून ८२० दशलक्ष लिटर आणि खराब झालेल्या अन्नधान्यापासून ४५० दशलक्ष लिटर उत्पादन झाले. याचा अर्थ असा की, मक्याचे योगदान उसाचा रस आणि बी-हेवी मळीच्या एकत्रित उत्पादनापेक्षा जास्त आहे आणि एकूण इथेनॉल उत्पादनात त्याचा वाटा अंदाजे ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. सध्याचे खरेदी दर मक्यावर आधारित इथेनॉलसाठी प्रति लिटर ₹७१.८६, उसावर आधारित इथेनॉलसाठी ₹६५.६१ आणि तांदळावर आधारित इथेनॉलसाठी प्रति लिटर ₹६०.३२ असे आहेत. वाढलेल्या किमतींमुळे शेतकऱ्यांसाठी मका फायदेशीर ठरत आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये मक्याची लागवड केली जाते, ज्यामुळे इथेनॉल उत्पादनाची व्याप्ती वाढते आणि वर्षभर पुरवठा कायम ठेवणे सोपे होते. याउलट उसाच्या लागवडीसाठी जास्त पाणी लागते, तर मक्याला कमी लागते. उसावरील अतिनिर्भरतेमुळे हवामान बदल, भूजल टंचाई आणि एल निनोसारख्या परिस्थितीमध्ये धोके वाढतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


















