सांगली : वसंतदादा कारखान्याची निवडणूक बिनविरोध, खासदार विशाल पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह २१ संचालक; १९ जण नवे

सांगली : येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक अखेर बिनविरोध झाली. आज, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी तेवढेच अर्ज शिल्लक राहिल्याने बिनविरोध निवड घोषित झाली. यात खासदार विशाल पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हषवर्धन पाटील, अमित पाटील आदी संचालकांचा समावेश आहे. कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक उपसंचालक (साखर) गोपाळ मावळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

‘वसंतदादा ‘चो पंचवार्षिक निवडणूक सन २०२५ ते २०३० बिनविरोध झाली. खासदार विशाल पाटील यांना अखेरच्या क्षणी निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील यांचा कारखान्याच्या संचालकाच्या रुपाने प्रवेश झाल्याने वसंतदादा घराण्याची चौथी पिढी आता राजकारणात सक्रिय झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गोपाळ मावळे यांनी काम पाहिले. त्यांचे सहकारी विजय पाटील, दिवाकर पाटील यांनीही निवडणुकीचे काम पाहिले.

ChiniMandi WhatsApp Channel

वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे ३६ हजार सभासद आहेत. कारखान्याच्या २१ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होता. यामध्ये सांगली, मिरज, आष्टा, भिलवडी, तासगाव या पाच गटांतून प्रत्येकी तीनप्रमाणे पंधरा तर बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था सभासद मतदासंघातून दोन, अनुसूचित जाती किंवा जमातीचा एक, भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्ग गटातून एक, तर महिला गटातून दोन असे २१ संचालक निवडणूक द्यायचे होते. त्यासाठी १४४ अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज छाननीत ५ अर्ज बाद ठरले, १३९ जणांपैकी सोमवार अखेर १३ जणांनी माघार घेतली. शेवटच्या दिवशी १२६ पैकी १०५ उमेदवारांनी माघार घेतली.

बिनविरोध संचालक: उत्पादक सह. संस्थाः खासदार विशाल पाटील (सांगली), उत्पादक गट सांगली बाळासाहेब पाटील (कळंबी), दिनकर साळुंखे (माधवनगर), हर्षवर्धन पाटील (सांगली), मिरज गटः दौलतराव शिंदे (म्हैसाळ), शिवाजी कदम (शिरखोण), तानाजी पाटील (खंडेराजुरी), आष्टा गट- संजय पाटील (कवठेपिरान), ऋतुराज सूर्यवंशी (अंकलखोप), विशाल चौगुले (कसबेडिप्रज) भिलवडी गट यशवंतराव पाटील, गणपतराव सावंत पाटील (सावंतपूर), अमित पाटील (येळावी), तासगाव गट अंकुश पाटील (बोरगाव), उमेश मोहिते (मांजर्डे), गजानन खुजट (तासगाव). अनुसूचित जाती-जमाती विशाल चंदरकर (कवठेएकंद), महिला गट-सुमित्रा खोत (हरिपूर) व शोभा पाटील (म्हैसाळ). इतर मागासवर्गीय अंजूम महात (सांगली). भटक्या-विमुक्त जाती व जमाती प्रल्हाद गडदे (ब्रह्मनाळ).

दादांची चौथी पिढी राजकारणात…

प्रतीक पाटील यांचे सुपुत्र हर्षवर्धन यांची सांगली उत्पादक गटातून बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे वसंतदादा पाटील यांची राजकारणात चौथी पिढी सक्रिय झाली आहे. विद्यमान संचालक व वसंतदादा शेतकरी शिक्षण मंडळाचे अमित पाटील यांना देखील पुन्हा संधी देण्यात आली. निवडणूक बिनविरोधसाठी खासदार विशाल पाटील, अमित पाटील यांनी गेल्या आठवड्यापासून प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले.

संचालक मंडळात १९ नवे चेहरे…

वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत या वर्षों विद्यमान अध्यक्ष खासदार विशाल पाटील यांनी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २१ संचालकांपैकी १९ हे नवे चेहरे आहेत. सर्वांत तरुण चेहरा म्हणून प्रतीक पाटील यांचे सुपुत्र हर्षवर्धन पाटील असणार आहेत. खासदार विशाल पाटील, तर त्यांचे मावस बंधू अमित पाटील हे केवळ जुने चेहरे आहेत.

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here