पणजी : ‘हरित गोवा, सशक्त गोवा आणि स्मार्ट गोवा’ या संकल्पनेंतर्गत गोव्यात विविध हरित प्रकल्प आणण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेत आहे. त्यापैकी एक पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त इथेनॉल प्लांट आहे, जो डिचोली तालुक्यातील नावेली गावात उभारला जात आहे. नावेलीमध्ये हा प्रकल्प उभारण्यासाठी स्थानिकांना सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. हा प्रकल्प गावातील कृषी क्षेत्राला आधार देईल. स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण करेल आणि गुरांना चारा देखील पुरवेल, असेही ते म्हणाले.
डिचोली येथील नावेली औद्योगिक क्षेत्रात सेंट्रल बायोफ्युएल्स लिमिटेडच्या ३०० केएलपीडी धान्य-आधारित इथेनॉल प्लांटची पायाभरणी केल्यानंतर मुख्यमंत्री सावंत बोलत होते. नावेलीचे सरपंच रोहिदास कसेकल, उपसरपंच कल्पना गावस, पंचायत सदस्य गोपाळ सुरळकर आणि सेंट्रल बायोफ्युएल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बॉबी जॉर्ज हेदेखील यावेळी उपस्थित होते.सावंत म्हणाले की, “नावेली औद्योगिक क्षेत्रात पूर्वी स्थापन झालेले उद्योग प्रदूषण निर्माण करण्यास जबाबदार होते आणि त्यातील सुमारे ९९ टक्के कामगार गोव्यातील नाहीत. सेंट्रल बायोफ्युएल्स लिमिटेड प्रदूषणमुक्त असेल आणि यातील ९० टक्के कामगार गोव्यातील असतील. कंपनी ऊस आणि इतर पिकांपासून इथेनॉल तयार करेल.
सेंट्रल बायोफ्युएल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक जॉबी जॉर्ज म्हणाले की, त्यांची कंपनी दररोज ३०० केएलपीडी धान्य-आधारित इथेनॉलचे उत्पादन करेल. त्यांच्या क्षमतेच्या ८० टक्के वापर करण्याचे उद्दिष्ट ठेवते. स्वच्छ इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेल्या इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम (ईबीपी) अंतर्गत उत्पादित इथेनॉल तेल विपणन कंपन्यांना (ओएमसी) पुरवले जाईल. या प्रकल्पामुळे स्थानिक रहिवाशांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगाराच्या महत्त्वपूर्ण संधी निर्माण होतील. हे धान्य स्थानिक शेतकऱ्यांकडून थेट खरेदी केले जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत हातभार लागेल. डिस्टिलरच्या धान्यासारख्या उप-उत्पादनांचवापर पौष्टिक पशुखाद्य म्हणून केला जाईल.