सोलापूर : म्हैसगाव (ता. माढा) येथील ओंकार शुगर कॉर्पोरेशन्स प्रा. लि. या कारखान्याचा गळीत हंगाम २०२५-२६ साठी मिल रोलर पूजन जनरल मॅनेजर सुनील बंडगर, प्रशासकीय अधिकारी चक्रधर घुले यांच्या हस्ते झाले. ओंकार ग्रुपचे सर्वेसर्वा बाबूराव बोत्रे- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी गळीत हंगाम वेळेत सुरू करण्यासाठी, कारखान्याची मशिनरी देखभाल दुरुस्तीची कामे प्रगतिपथावर आहेत. कारखाना पूर्ण क्षमतेने चालू करण्यासाठीची कामे अंतिम टप्प्यात आहेत, अशी माहिती जनरल मॅनेजर बंडगर यांनी दिली.
बंडगर यांनी सांगितले की, आगामी गळीत हंगामाकरिता १४,००० हेक्टर क्षेत्रातील उसाची नोंद पूर्ण झाली आहे. त्यासाठी तोडणी वाहतुकीसाठी ५२९ ट्रक / ट्रॅक्टर, ४९० ट्रॅक्टर गाडी, ५८६ बैलगाडी व ७ हार्वेस्टर मशिन असे एकूण १६१२ करारही पूर्ण झाले आहेत. यावेळी कारखान्यातील खातेप्रमुख, वर्क्स मॅनेजर विभीषण खराडे, चीफ केमिस्ट दुर्विजय यादव, डिस्टिलरी मॅनेजर अनिल शेळके, चीफ अकाउंटंट अमोल ढवळे, बाळासाहेब देवकते यांसह विभागप्रमुख, कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.