बेळगाव : उसाला योग्य दर मिळण्यासाठी विविध शेतकरी संघटनांनी तब्बल महिनाभर आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे यावर्षी तालुक्यात ऊसतोडणीच्या कामाला उशीर झाला होता. अखेर ऊसदराचा तिढा संपुष्टात आला. त्यामुळे आठवड्यापासून निपाणी तालुक्यात ऊसतोडणीला प्रारंभ झाला आहे. मात्र ऊस तोडणी मजुरांऐवजी हार्वेस्टरनेच करण्यावर भर देण्यात आला आहे. दोन लाख रुपयांवर गेलेला ऊसतोडणी मजुरांचा कोयता याला कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येते. यावर्षी पावसाअभावी ऊस उत्पादनात घट झाली आहे. शिवाय अनेक टोळ्यांना अॅडव्हान्स रक्कम देऊनही किरकोळ टोळ्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे हार्वेस्टिंग मशीनद्वारे शेतकरी उसाची तोडणी करीत आहेत, असे वाहतुकदार सुरेश पाटील यांनी सांगितले.
यंदा तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने ऊस आणि इतर पिकांची म्हणावी तशी वाढ झालेली नाही. दुसरीकडे ऊस तोडणी मजुरांनी दरवाढ केली आहे. त्याचा मुकादम आणि वाहतूकदारांवर परिणाम झाला आहे. शिवाय ऊसतोडणी मजुरांची कमतरता भासत असल्याने शेतकऱ्यांनी हार्वेस्टिंग मशीनद्वारे ऊसतोडणीला प्राधान्य दिले आहे. कर्नाटकातील कारखान्यांनी ३६०० ते ३८०० रुपयांपर्यंत दर दिल्यानंतर ऊस तोडणीला गती आली आहे. पण यावर्षी मजुरांच्या टोळ्या कमी आल्या आहेत. त्यामुळे यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखानदारांना कंबर कसावी लागत आहे. हार्वेस्टरद्वारे तोडणी सुरू असल्याने हंगाम लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता आहे.


















