सोलापूर : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतलेल्या बैठकीनंतर जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामात गाळप करणाऱ्या ३४ साखर कारखान्यांपैकी १९ साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर केला आहे. मात्र, उर्वरित १५ कारखान्यांनी अद्याप ऊस दर जाहीर केलेला नाही. संबंधितांनी तातडीने ऊस दर जाहीर करावा, अन्यथा गंभीर दखल घेण्यात येईल, असा इशारा प्रभारी उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिला. दर जाहीर न केलेल्या कारखान्यांमध्ये श्री सिद्धेश्वर, श्री संत दामाजी, लोकनेते, लोकमंगल (बीबीदारफळ व भंडारकवठे), सिद्धनाथ, इंद्रेश्वर, युटोपियन, गोकूळ, जयहिंद, व्हीपी, भीमा, सहकार शिरोमणी, धाराशिव, आवताडे शुगर या कारखान्यांचा समावेश आहे. दरम्यान, ऊस दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यानंतर अक्कलकोटमध्ये आंदोलन झाले. तर दक्षिण सोलापुरातही आंदोलन सुरू आहे.
यंदा १ नोव्हेंबरपसून गळीत हंगाम सुरू झाला. यावेळी काही साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर न करताच गाळप हंगाम सुरू केल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे करण्यात आल्या. त्याची दखल घेत त्यांनी १४ नोव्हेंबर रोजी बैठक बोलावली. मात्र, तेव्हा कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे पुन्हा १७ नोव्हेंबर रोजी बैठक बोलवावी लागली होती. या बैठकीत त्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत ऊसदर जाहीर करण्याच्या स्पष्ट सूचना कारखान्यांच्या प्रतिनिधींना दिल्या होत्या. मात्र, १९ कारखान्यांनीच दर जहीर केला. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. या कारखान्यांना ऊसदर जाहीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे.


















