पुणे : ऊस तोडणीसाठी तरुणाचे सोलापूरला अपहरण, जबदरस्तीने करायला लावले काम

पुणे : डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या तरुणाला दररोज एक हजार रुपये रोजगाराच्या आमिषाने फसवून त्याच्याकडून जबरदस्तीने ऊस तोडणी करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणासह काही जणांना सोलापूर येथे नेण्यात आले. तेथे डांबून ठेवून त्यांना मारहाण करत त्यांच्याकडून काम करवून घेण्यात आल्याचे उघड झाले आहे. पुणे रेल्वे स्टेशन परिसरात असेच एजंट अनेक तरुणांना फसवून ऊसतोडणीसाठी डांबून ठेवत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. संबंधीत तरुण २३ डिसेंबर रोजी रात्री उशिरा अरोरा टॉवर परिसरात डिलिव्हरी करून पुणे रेल्वे स्टेशन परिसरात झोपला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्याला मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले. दिवसभर स्टेशन परिसरात फिरल्यानंतर रात्री अनोळखी व्यक्तीने त्याला कामाची विचारणा केली.

पुण्याजवळ शेतात काम असून रोज १००० रुपये मजुरीचे आमिष दाखवले. रात्री ११ वाजता पुणे स्टेशनवरून त्याला आणखी काही तरुणांसह कारमध्ये बसवून सोलापूर जिल्ह्यात नेले. म्हाडा परिसरात एका खोलीत त्याला ठेवण्यात आले. येथे अप्पा तांबे यांच्यामार्फत त्याच्याकडून ऊसतोडणीचे काम जबरदस्तीने करून घेतले जात होते. पहाटे ४ ते रात्री १० वाजेपर्यंत काम करण्यास भाग पाडले जात होते. काम नाकारल्यास मारहाण केली जात होती. २९ जानेवारी रोजी पहाटे या तरुणाने येथून पळून जाऊन कुर्डवाडी रेल्वे स्टेशनवरून वडिलांशी संपर्क साधला. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here