धुळे : साक्री तालुक्यातील पांझरा कान सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासंदर्भात पांझरा कान बचाव संघर्ष समितीची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष डॉ. तुळशीराम गावित होते. यावेळी प्रा. नरेंद्र तोरवणे म्हणाले की, स्पायका ग्रीन ॲग्रो अँड प्रोजेक्ट्स कंपनीने कारखाना खरेदीसाठी अपेक्षित रकमेपैकी २५ टक्के रक्कम भरली असून उर्वरित ७५ टक्के रक्कम भरण्यासाठी १५ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ घेतली आहे. मात्र कारखान्याची काही जमीन ६० वर्षांच्या भाडेपट्टद्यावर देणे तसेच काही गट नंबर भोगवटदार-२ ऐवजी भोगवटदार-१ मध्ये वर्ग करण्याची मागणी कंपनीकडून करण्यात आली आहे. यावरून बचाव समिती व उद्योगपती गायकवाड यांच्यात मतभेद असल्याचे स्पष्ट झाले.
बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आलेल्या महत्त्वाच्या ठरावानुसार पांझरा कान सहकारी साखर कारखान्याच्या अटी व शर्ती कायम ठेवून, स्पायका ग्रीन ॲग्रो कंपनीला भाडेपट्टयावर जमीन देण्यात यावी आणि कारखाना तात्काळ सुरू करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणी पुढील बैठक ९ फेब्रुवारी रोजी धुळे येथे उद्योगपती गायकवाड यांच्या उपस्थितीत सर्व समिती सदस्यांसह होणार असून, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या बैठकीस कामगार नेते अशोक भामरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे, भाजपचे वेडू सोनवणे, शेतकरी संघटनेचे भटू अकलाडे, निंबा जाधव, कासारे येथील प्रा. युवराज काकुस्ते, कारखान्याचे अवसायक प्रतिनिधी शिवाजी सोनवणे, भाडणेचे सरपंच अजय सोनवणे तसेच समितीचे सचिव प्रा. नरेंद्र तोरवणे आदी उपस्थित होते.















