छत्रपती संभाजीनगर : खडकपूर्णा अॅग्रो लिमिटेडने भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतलेल्या सिल्लोड तालुक्यातील काळी माणिकनगर (भवन) येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ या सहाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला.
या निमित्ताने बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक यांच्या हस्ते बॉयलर पूजन, मोळी पूजन करून गाळप हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. तसेच कारखान्यात दाखल झालेल्या पहिल्या ऊस वाहतूक वाहनाचे आणि वजन काट्याचे पूजनही यावेळी करण्यात आले.यावेळी राधेश्याम चांडक आणि कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश्वर मोठे यांनी कारखान्याच्या आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला सिद्धेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष सपकाळ, सुनील प्रसाद, राजूर गणपती संस्थानचे विश्वस्त शेषराव जायभाये, समाधान डोईफोडे, खडकपूर्णा अॅग्रोचे चेअरमन अनिल गुंजाळ, पूजा गुंजाळ, कामगार युनियनचे अध्यक्ष हरिदास कळम, अशोक साबळे, सलीम मुलतानी, जगन्नाथ गाढे, बाजीराव दाभाडे, आबासाहेब जंजाळ, अविनाश रगडे यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक, पदाधिकारी आणि साखर कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बागूल यांनी केले, तर सचिन देशमाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.


















