अहिल्यानगर : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याच्या कार्यक्षेत्रात राज्यभरातून येणाऱ्या ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी साखर शाळा हा उपक्रम राबवला जातो. मागील दोन वर्षापासून साखर शाळेचे आयोजन बी.एड. महाविद्यालयातर्फे केले जाते. यावर्षीही, शैक्षणिक वर्ष २०२५- २६ मध्ये बीएड. महाविद्यालयातर्फे साखर शाळेचा उपक्रम राबविण्यात आला. यात बीएड. महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी ऊस तोडणी कामगारांच्या मुलांना अक्षर ओळख, वाचन, लेखन या शिक्षणातील मूलभूत शिकवितात. या उपक्रमातून ऊस तोडणी मजुरांच्या मुलांना शिक्षणाचे धडे मिळावेत आणि त्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, हा प्रयत्न संस्थेच्या प्रवरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या माध्यमातून यशस्वीपणे अनेक वर्षापासून राबविला जात असल्याची माहिती प्राचार्य डॉ. सचिन भोसले यांनी दिली.
या साखर शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य, वही, पेन आणि अंकलिपी यांचे वाटप करण्यात आले. प्रा. नयना औताडे यांनी संयोजक म्हणून नियोजन केले. या उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांत्रिक विभागाचे शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, कॅम्पस डायरेक्टर डॉ. महेश खर्डे यांनी कौतुक केले. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी प्रवरेच्या माध्यमातून शिक्षण संस्था सुरू केल्या. या माध्यमातून त्यांचा वारसा जतन करत संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे यांच्या मार्गदर्शनातून विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती प्राचार्य भोसले यांनी दिली.

















