अहिल्यानगर : शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील लेखापरीक्षण अहवालाची प्रत मिळावी, यासाठी सभासद भाऊसाहेब पवार यांनी ९ व १९ ऑक्टोबर रोजी ई-मेलद्वारे कारखान्याकडे मागणी केली होती. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही अहवाल मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी ३१ ऑक्टोबर रोजी प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहिल्यानगर यांच्याकडे तक्रार दाखल केली.लेखापरीक्षण अहवाल देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारीची दखल घेत प्रादेशिक सहसंचालकांनी कारखाना प्रशासनाला नोटीस बजावली आहे.
प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालकांना ५ नोव्हेंबर रोजी नोटीस बजावली. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील तरतुदींनुसार लेखापरीक्षण अहवाल कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, मुदतीत अहवाल न दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. सभासद भाऊसाहेब पवार यांनी आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त करत सहकार विभागाकडे तक्रार केली होती. कारखान्याचा आर्थिक लेखाजोखा मिळविण्यासाठी सभासदाने सहकार विभागाचे दार ठोठवल्याने पारदर्शकतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


















