सांगली : श्रीपती शुगर डफळापूर-कुडणूर साखर कारखाना येथे आधार प्रोजेक्ट्स वेल्फेअर सोसायटी, सांगली यांच्या वतीने स्थलांतरित उसतोड मजूर व वाहतूकदारांसाठी एचआयव्ही-एड्स जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा शल्यचिकित्सक विक्रमसिंह कदम, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. विवेक सावंत, तसेच आधार प्रोजेक्ट्स वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक सुरेशकुमार संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कारखान्याचे सरव्यवस्थापक महेश जोशी, शेती अधिकारी सतीश मिरजकर, रंजित जाधव व कर्मचारी उपस्थित होते.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमा क्षीरसागर, तालुका आरोग्य सहाय्यक बारापत्रे, डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रुती साळे, कुडणूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल तेली, तसेच जत ‘आयसीटीसी’चे समुपदेशक तानाजी सुतार यांनी एचआयव्ही संसर्गाचे मार्ग, प्रतिबंध, गैरसमज व सामाजिक जाणीव याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमस्थळी पोस्टर प्रदर्शनातून एचआयव्ही व संबंधित आजारांबाबत माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे कामगारांमध्ये एचआयव्ही-एड्सबाबत जागरुकता निर्माण होऊन समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होणार आहे. एचआयव्ही संदर्भातील अधिक माहितीसाठी १०९७ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. प्रकल्प व्यवस्थापक अभिजित नाईक, समुपदेशक सुषमा इंगवले, सविता हजारे, विजय लांडगे व ‘महालॅब’ समन्वयक सुरेश कांबळे उपस्थित होते.


















