सांगली: राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यात राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहानिमित्त कार्यक्रम झाला. याप्रसंगी जनरल मॅनेजर (वर्क्स) विजय मोरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी सर्वांना सुरक्षिततेची शपथ दिली. यावेळी कामगार युनियनचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, सचिव डी. एम. पाटील, जनरल मॅनेजर (उत्पादन) सुनील सावंत, असिस्टंट जनरल मॅनेजर संदीप पाटील, सिव्हिल इंजिनिअर प्रेमनाथ कमलाकर, डिस्टिलरी मॅनेजर धैर्यशील पाटील, उमेश सुतार, महेश पाटील, संजय गुरव, संभाजी खोत, भूपाल पवार उपस्थित होते. विना अपघाताची कारखान्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रत्येक कामगार, अधिकाऱ्यांनी सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी केले.
यावेळी माहुली म्हणाले की, एखादा अपघात संस्थेचे नुकसान करतोच; परंतु त्यापेक्षाही कामगार व त्यांच्या कुटुंबावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे कामगारांची सुरक्षितता जपणे ही सर्वांची जबाबदारी आहे. माजी मंत्री आमदार जयंत पाटील व कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे. दरम्यान, कारखान्याच्या तिन्ही युनिटवरही सुरक्षा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. वाटेगाव-सुरुल येथे चीफ इंजिनिअर संताजी चव्हाण यांनी ध्वजवंदन करून कामगारांना सुरक्षिततेची शपथ दिली. कारंदवाडी येथे असिस्टंट चीफ इंजिनिअर संग्राम चव्हाण व चीफ केमिस्ट उमेश शेटे यांनी. तिप्पेहळळी जत येथे रत्नाकर शिंदे व प्रकाश पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.


















