मुंबई : पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यातील आर्थिक गैरप्रकारांबाबत विविध पातळ्यांवर चौकशी सुरू आहे, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून कारखाना भाडेतत्वावर देताना केलेल्या त्रिपक्षीय करारातील अटींचा भंग झाल्यास साखर आयुक्तांकडे लवाद प्रक्रियेंतर्गत प्रकरण चालविण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. सहकारी संस्थांच्या कायद्यातील कलम ८३ अंतर्गत स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली असून ती लवकर पूर्ण करून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. कारखान्याचे लेखापरीक्षण करणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंटविरुद्धही कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुख्य व्यवस्थापक (सीएम) म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
आमदार विलास भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या साखर कारखान्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी उत्तर दिले. कारखाना २०१४-१५ मध्ये भाडे तत्वावर सचिन घायाळ शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला १८ वर्षांच्या कराराने देण्यात आला. त्या वेळी कंपनीने सुमारे ५७ कोटी रुपयांचे दायित्व स्वीकारले होते. मात्र लेखापरीक्षणात आर्थिक गैरप्रकार आढळून आले. या प्रकरणात २६ फेब्रुवारी रोजी सचिन घायाळ शुगर प्रायव्हेट लिमिटेडच्या सर्व भागधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारखान्याने बुलढाणा अर्बन बँकेकडून ३० कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याची बाबही खरी आहे. यापैकी १३ कोटी ८३ लाख रुपये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे देणे फेडण्यासाठी वापरल्याचे दिसून आले आहे. उर्वरित १६ कोटी १७ लाख रुपये कारखान्याच्या आधुनिकीकरणासाठी वापरल्याचा दावा केला असला तरी त्याची पडताळणी सुरू असल्याचे सहकारमंत्र्यांनी सांगितले.
















