पुणे : राज्यातील २०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामासाठी साखर आयुक्तालयाने आवश्यक अटी व निकषांची पूर्तता केलेल्या २०० साखर कारखान्यांना गाळप परवाने मंजूर केले आहेत. मात्र, ज्या कारखान्यांकडे अधिकृत गाळप परवाना नाही, अशा कारखान्यांना शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा करू नये. परवानाधारक कारखान्यांची खात्री करूनच उसाचे नियोजन करावे, असे आवाहन साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी केले आहे.
यंदाच्या गाळप हंगामासाठी परवाने मंजूर झालेल्या २०० कारखान्यांमध्ये ९९ सहकारी आणि १०१ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. साखर आयुक्तालयाने या कारखान्यांची अधिकृत यादी आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.
यासंदर्भात साखर सहसंचालक (विकास) महेश झेंडे यांनी सांगितले की, वैध गाळप परवाना असलेल्या कारखान्यांनाच शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळपासाठी द्यावा. विनापरवाना किंवा अनधिकृत कारखान्यांना ऊस पुरवठा केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊस पुरवठ्यापूर्वी कारखान्याचा परवाना तपासणे आवश्यक आहे.
परवानाधारक साखर कारखान्यांची सविस्तर व अद्ययावत यादी साखर आयुक्तालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://mahasugar.in येथे उपलब्ध आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संकेतस्थळाला भेट देऊन संबंधित कारखान्याचा गाळप परवाना असल्याची खात्री करावी आणि त्यानंतरच आपल्या उसाचे नियोजन करावे, असे आवाहन साखर आयुक्तालयाने केले आहे.


















