कोल्हापूर : केंद्र सरकारने साखर कारखान्यांना उसाची रिकव्हरी तपासण्यासआठी केन सॅम्पलर मशीन बसविण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, साखर कारखाने त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे ‘आंदोलन अंकुश’ संघटनेने शेतकऱ्यांच्या मालकीची रिकव्हरी तपासणी प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी सध्या शेतकऱ्यांकडून निधी संकलन सुरू आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती ‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी दिली. उसाची खरी रिकव्हरी शेतकऱ्यांना समजावी म्हणून शेतकऱ्यांच्या मालकीची रिकव्हरी प्रयोगशाळा उभारण्याचा संकल्प केला आहे. आतापर्यंत दीड लाख रुपये जमा झाले असून, शेतकरी स्वत:हून पैसे देत आहेत, असे चुडमुंगे यांनी सांगितले.
याबाबत चुडमुंगे म्हणाले की, उसाच्या वजनामध्ये पारदर्शकता असावी, यासाठी शेतकरी संघटना नेहमीच आग्रही राहिली. शासनाने स्वतःच्या मालकीचे वजनकाटे उभे करावेत, अशी मागणी संघटनांची होती; पण शासनाने फारसे मनावर न घेतल्याने आंदोलन अंकुश संघटनेने शिरोळमध्ये स्वतःचा वजनकाटा बसवला आहे. यामुळे त्या कार्यक्षेत्र कारखान्यांवर चाप बसला आहे. आता गेल्या दोन वर्षांपासून संघटना साखर कारखान्यांना केन सॅम्पलर मशीन बसवण्याची सक्ती करा, या मागणीसाठी साखर आयुक्तांकडे पाठपुरावा करत आहे. साखर कारखान्यांकडून उसाच्या रिकव्हरीबाबत शेतकरी संघटनांचे आक्षेप आहेत. शेतकऱ्यांना पाठवलेल्या उसाची रिकव्हरी अगोदरच समजायला हवी. सध्या उसाचे वजन, रिकव्हरी आणि दराबाबत कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये कमालीची जागरूकता आहे. संघटनांच्या प्रबोधनामुळेच ही जागृती झाली आहे. पण, प्रचलित पद्धतीवर केवळ आक्षेप घेण्यापेक्षा ते सिद्ध करण्यासाठी रिकव्हरी तपासणीची प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.


















