जालना : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एआय तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. शेतकऱ्यांकडूनही त्यांचा वापर वाढू लागला आहे. ‘एआय’च्या मआध्यमातून ऊस शेती करून शेतकरी एकरी १०० टनाचा टप्पा सहजतेने पार करत असल्याचे दिसून आले आहे. एआय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पाणी, वेळ आणि खर्चाची बचत झाली आहे. अरगडे गव्हाण (ता. घनसांगवी) येथील प्रगतिशील शेतकरी रणजित शंकरराव गुजर यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून एकरी सरासरी ११२ टन उत्पादन घेतले आहे. त्यांनी सात एकर क्षेत्रातून तब्बल ७८० टन ऊस उत्पादन घेत ऊस उत्पादनात शतकवीर होण्याचा मान मिळविला.
एआय पद्धतीने ऊस लागवड केल्यास ठिबक सिंचनाद्वारे एकरी ४० लाख लिटर पाण्याचा वापर होतो. या पद्धतीमध्ये एकरी खर्च सुमारे ८० हजार रुपयांपर्यंत येतो. साधारणपणे तीन लाख ३० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. खर्च वजा जाता दोन ते सव्वा दोन लाख रुपये नफा मिळतो. एकरी ७० ते ११० टनापर्यंत उत्पादन मिळत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
प्रगतशील शेतकरी गुजर यांना कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक राजेश टोपे, कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे एआय प्रमुख तुषार जाधव आणि सागर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. ए. समुद्रे यांनी एआय तंत्रज्ञानावरील ऊस शेतीबाबत मार्गदर्शन केले. सर्वाधिक उत्पादन घेतल्याबद्दल कारखान्याच्या अध्यक्षा डॉ. दिशा टोपे यांनी गुजर यांचे अभिनंदन केले. गुजर यांनी सांगितले की, रासायनिक खतांचा आणि अतिरिक्त पाण्याचा वापर यामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच उसाचे पाचट जाळू नये.


















