बेळगाव : चिदानंद बसवप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याच्यावतीने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना ऊस विकासासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. या अंतर्गत येथील युवा शेतकरी चंद्रकांत आबासाहेब चव्हाण यांनी ‘८६०३२’ या जातीचा ऊस पिकविला आहे. या उसाची सध्या तोड चालू आहे. या उसाचे त्यांना एकरी १०० टनांपर्यंत उत्पादन मिळाले आहे. आपण गेल्या चार वर्षांपासून मी चिदानंद कोरे कारखान्याच्या तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार ऊस पीक घेत आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरीही या वर्षी उसाचा उतारा १०० टन साध्य झाला आहे. पिकाची वाढ यावर्षी चांगली झाली आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.
चंद्रकांत चव्हाण यांनी कोरे कारखान्याच्यावतीने सुरू असलेल्या ऊस विकास योजनेच्या मार्गदर्शनाखाली साडेचार फुटांच्या दोन सरीच्या अंतरावर सात फुटांच्या अंतरातून भुईमूग पीक घेतले. या क्षेत्रातून १४ क्विंटल भुईमूगाचे उत्पादन मिळाले. त्यानंतर चव्हाण यांनी जून २०२५ च्या पहिल्या आठवड्यात एक डोळा पद्धतीने उसाची लावण केली. दहा दिवसांच्या अंतराने पाट पद्धतीने उसाला पाणी दिले जात होते. एकूण उसाची वाढ ३० फूट आहे. एका उसास ४० ते ४२ कांड्या आहेत. एका उसाचे वजन सरासरी ४ किलोवर आहे. याबाबत कारखान्यचे ऊस विकासाधिकारी एन. एस. हिरेमठ म्हणाले, चिदानंद कोरे साखर कारखान्यातर्फे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पिकाच्या वाढीसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.


















