छत्रपती संभाजीनगर : जय हिंद शुगरकडून ऊस बिले थकीत, प्रहार जनशक्ती पक्षाचा आंदोलनाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील जय हिंद शुगर कारखान्याकडून पेमेंट न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची कर्जखाती थकबाकीत गेली असून, खासगी सावकारांचा तगादा वाढला असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे. याबाबत पक्षाच्यावतीने प्रादेशिक साखर संचालक, तहसीलदार, कारखाना प्रशासन, कारखान्याचे चेअरमन कृष्णा पाटील, जय हिंद चेअरमन गणेश माने देशमुख, शेतकी अधिकारी भाकरे व कार्यकारी संचालकांना निवेदन देण्यात आले. कारखान्याने १ जानेवारी ते १५ मार्च या कालावधीतले कोट्यवधी रुपयांचे ऊस बिल थकीत ठेवले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

कारखान्याने शेतकऱ्यांना ३० मार्चपर्यंत थकबाकी अदा करावी अन्यथा ३० मार्च रोजी कारखाना गेटवर दवंडी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्तीने दिला आहे. जोपर्यंत ऊस बिल मिळत नाही, तोपर्यंत सहकुटुंब अन्नत्याग सत्याग्रह करण्याची भूमिका ऊस उत्पादक शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके पाटील, दादा पाटील चव्हाण, बाळासाहेब शिंदे, इम्रान पठाण आदींनी जाहीर केली आहे. जय हिंद शुगरने मोठ्या भांडवलदार शेतकऱ्यांचे पैसे ऊस आल्यानंतर १५ दिवसांत अदा केले. तर लहान व गरीब शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप पक्षाने केला आहे. हा प्रकार ऊस अधिनियमाचे उल्लंघन असून, कारखान्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here