बीड : पुणे येथे महाराष्ट्र केसरी अधिवेशन १८ ते २२ मार्चदरम्यान पार पडले. या स्पर्धेत अंतिम लढतीत गादी विभागात कोल्हापूर येथील सात्तपा हिरगुडे या मल्लास चितपट करत शेलापुरी या पुनर्वसित गावातील ऊसतोड मजुराचा मुलगा सुमितकुमार आप्पासाहेब भारस्कर याने ज्युनिअर महाराष्ट्र केसरी (७० किलो वजन गट) सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत कोल्हापुरच्या सात्तपा हिरगुडेचा सुमितकुमारने ६-० अशा गुण फरकाने पराभव केला. सुमितकुमार हा पुण्यातील मारुंजी येथे अमोल बुचडे कुस्ती अकादमीमध्ये कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे. त्याला रुस्तम-ए-हिंद, महाराष्ट्र केसरी पैलवान अमोल बुचडे, प्रशिक्षक नरेंद्र कुमार, घुले, समीर देसाई, गुंड, कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. या अभूतपूर्व यशामुळे माजलगावसह बीड जिल्ह्याचा दबदबा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अधोरेखित झाला आहे.
शहरापासून जवळच असलेल्या शेलापुरी या पुनर्वसित गावातील सुमितकुमार हा उदयोन्मुख खेळाडू आहे. त्याने स्पर्धेच्या पहिल्या चार फेऱ्यांमध्ये १०-०० अशा गुण फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. पुणे शहरचा मल्ल विपुल थोरात याच्यासोबत ८-५ अशी लढत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम स्पर्धेत साताप्पाचा पराभव केला. याबाबत सुमितकुमार म्हणाला की, माझ्यासाठी हा किताब जिंकणे स्वप्नपूर्ती आहे. यासाठी खूप वर्षे मेहनत घेतली. अनेक अडचणींवर मात केली. माझ्या गुरूंनी, कुटुंबीयांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच हे यश शक्य झाले. ही भविष्यात चांगली कामगिरी करत महाराष्ट्र केसरी व्हायचे आहे. सुमितकुमारचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.


















