अहिल्यानगर : सहकारमहर्षी थोरात कारखान्यातर्फे हुमणी कीड नियंत्रणासाठी मार्गदर्शन कार्यशाळा

अहिल्यानगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर भारतीय कृषी संशोधन परिषद व ऊस संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हुमणी अळी नियंत्रणासाठी कॉम्बो ट्रॅप वापराबाबत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. व्यासपीठावर लखनऊ येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेश्वर बोरसे, शास्त्रज्ञ डॉ. योगेश थोरात, उपाध्यक्ष पांडुरंग घुले, संचालक रामनाथ कुटे, विजय राहणे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, प्रा. जी. बी. बाचकर आदी उपस्थित होते. ऊस पिकात एकरी उत्पादन वाढीमध्ये हुमणी अळीसारख्या अनेक अडचणी येतात. हुमणी अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कॉम्बो ट्रॅपचा वापर प्रभावी ठरेल, असे प्रतिपादन माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले.

माजी मंत्री थोरात यांनी सांगितले की, सध्या राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढवली, त्यामुळे उसासाठी सर्वत्र स्पर्धा सुरू आहे. अशा काळात आपल्या कारखान्याने शेतकऱ्यांना कायम चांगला भाव दिला आहे. आता शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवडीबरोबर एकरी उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. यावेळी डॉ. योगेश थोरात यांनी हुमणीच्या नियंत्रणाबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, हुमणी अळीचा प्रादुर्भाव ऊस, नारळ, डाळिंब या पिकांवरही होतो. मुरबाड जमीन, शेतीलगत बोर, निंब, बाभळ अशा झाडांमुळे अळी वाढते. उन्हाळ्यामध्ये अळीचे भुंगेरे बाहेर येतात. कॉम्बो ट्रॅपमुळे रात्री भुंगेरे एकत्र गोळा करता येतात आणि जमिनीत काढून त्याचे खत तयार करता येते. कॉम्बो टॅप वापरासोबतच अधिक अळी असल्यास जैविक कीडनाशकांचा वापर करावा, असेही त्यांनी सुचवले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here