अहिल्यानगर : दरवर्षी सुमारे साडेसहा लाख टन गाळप करणाऱ्या अशोक साखर कारखान्याला यंदाचा गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये हंगामात केवळ ३ लाख ९० हजार टन गाळप करून हंगाम आटोपता घ्यावा लागला. सातत्याने इतर कारखान्यांच्या तुलनेत कमी दर मिळत असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने गाळप हंगाम अडचणीत येणार आहे. त्यामुळे कारखान्याचे व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात वेतन कपातीसंदर्भात वाटाघाटी सुरू आहेत. त्यास विरोध केला जाईल. याबाबत आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले यांनी दिला आहे.
याबाबत भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कारखाना कामगारांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेणार असल्याचे समजते. गेल्या दोन दिवसांपासून कामगार संघटना व कारखाना व्यवस्थानात यासंदर्भात वाटाघाटी चालू आहेत. हा निर्णय घेतल्यास त्याला विरोध करणार आहोत. यातून, सभासदांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. नियोजनशून्य कारभारामुळे कारखाना आर्थिक दिवाळखोरीत आला असल्याचा आरोपही भोसले यांनी केला. कारखान्यात १०० कोटी रुपये खर्च करून फेल गेलेल्या डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्पांची क्षमतावाढ व ३५ कोटींच्या फेल गेलेला इन्सनीरेशन बॉयलर यांसारख्या उधळपट्टीमुळे कारखान्याला सुमारे ५० कोटी रुपये व्याजाचा भुर्दंड बसत आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.


















