कोल्हापूर : ऊसदराच्या लढ्यात मिळालेल्या यशानिमित्त म्हाकवे (ता. कागल) येथे आयोजित विजय आनंदोत्सव मेळाव्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्राम पाटील होते. यावेळी विविध संघटना, संस्था आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या वतीने शेट्टी यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
मुख्य मार्गावरून त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. वाडीचरण (ता. शाहूवाडी) येथेही शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शेतकरी नेते भारत पाटील होते. भविष्यात साखर कारखानेही गुजरातच्या दावणीला बांधले जाऊ नयेत, यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच सावध होऊन एकजूट दाखवावी,’ असे आवाहन शेट्टी यांनी यावेळी केले.
माजी खासदार शेट्टी म्हणाले की, ‘जागतिक बाजारपेठेत पुढील वर्षभरात साखरेचा भाव ५० रुपयांपेक्षा कमी येणार नसल्याची खात्री आहे. त्यामुळे उर्वरित दोनशेचा हप्ता मिळणारच आहे, तरीही शेतकऱ्यांनी यापुढे कारखान्यांच्या काटामारीकडे लक्ष द्यावे. ‘यंदाच्या ऊसदर आंदोलनाच्या यशात कागल तालुक्यातील शेतकऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. यापूर्वीच्या आंदोलनात कागलमधील कारखाने सुरूच राहायचे. मात्र, यंदा शेतकऱ्यांनी गटतट बाजूला ठेवून दाखविलेल्या संघटित ताकदीमुळे कारखान्यांना ऊसतोड सुरू करता आली नाही. शेतकऱ्यांच्या एकीचा हा विजय आहे.
राजेंद्र गड्ड्यान्नावर म्हणाले की, ऊसदराचा तोडगा निघाल्यानंतर काही नेते विविध गावांमध्ये फलक लावून श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. कंडका पाडला म्हणत आहेत. मात्र, आंदोलन सुरू होण्यापूर्वी हे नेते कुठे होते? शाखाध्यक्ष सुधीर पाटील यांनी स्वागत केले. पंढरी पाटील यांनी प्रास्ताविक केले. शेखर सावंत, जिल्हाध्यक्ष अजित पवार, पुरंदर पाटील, संभाजी यादव, तानाजी पाटील, अॅड. संदीप चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास अॅड. दयानंद पाटील, तालुकाध्यक्ष नामदेव भराडे, पांडुरंग अडसूळ, नीतेश कोगनोळे, के. डी. पाटील, नानासाहेब पाटील, शिवाजी पाटील, आप्पासाहेब पाटील, विश्वास हळदकर, सुधाकर चौगुले, दत्तात्रय चौगुले उपस्थित होते.


















