घरगुती एलपीजीचा पुरवठा स्थिर, दररोज सुमारे 28 लाख सिलिंडरचे वितरण : इंडियन ऑइल

नवी दिल्ली : इंडियन ऑइलने शुक्रवारी सांगितले की, जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम करणाऱ्या सध्याच्या भू-राजकीय घडामोडींनंतरही देशभरातील घरगुती एलपीजीचा पुरवठा स्थिर आणि पुरेसा आहे. कंपनीने स्पष्ट केले की, एलपीजीला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून देशातील घरांमध्ये त्याचा अखंड पुरवठा सुरू आहे.

कंपनीच्या निवेदनानुसार, इंडियन ऑइल सध्या दररोज सुमारे 28 लाख एलपीजी सिलिंडरचा पुरवठा करत आहे, जो अलीकडील भू-राजकीय तणावापूर्वीच्या सामान्य पातळीइतकाच आहे. ग्राहकांना बुकिंगसाठी एसएमएस आणि ‘आयव्हीआरएस’सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या सुमारे 87 टक्के बुकिंग डिजिटल माध्यमांतून होत असल्याचेही कंपनीने सांगितले. सिलिंडर योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (DAC OTP) वापरला जात आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

इंडियन ऑइलने सांगितले की, सोशल मीडियावर व्यक्त झालेल्या ग्राहकांच्या तक्रारींवर सक्रियपणे काम केले जात आहे आणि इंडेन ग्राहकांनी त्वरित मदतीसाठी अधिकृत सहाय्य माध्यमांचा वापर करावा,, असे आवाहन करण्यात आले आहे. काही एलपीजी वितरकांकडून काळाबाजार आणि साठेबाजीसारख्या अनियमिततेच्या तक्रारीही आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर अचानक तपासणीसाठी अनेक विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. आतापर्यंत 7,500 हून अधिक तपासण्या करण्यात आल्या असून 141 वितरकांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यापैकी 5 जणांना निलंबित करण्यात आले आहे.

इंडियन ऑइलने पुढे सांगितले की, गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी इतर तेल विपणन कंपन्या आणि राज्य सरकारांबरोबर समन्वयाने काम केले जात आहे. आतापर्यंत सुमारे 68,000 छापे टाकण्यात आले असून 855 एफआयआर नोंदवण्यात आल्या आहेत आणि 48,000 पेक्षा अधिक सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. ग्राहकांना दिलासा देताना कंपनीने स्पष्ट केले की, देशात एलपीजीची कोणतीही टंचाई नाही आणि घाबरून बुकिंग किंवा साठेबाजी करू नये. अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here