छत्रपती संभाजीनगर : साखरेचा उत्पादन खर्च लक्षात घेऊन किमान ४१ रुपये दर देण्याची मागणी साखर कारखानदार करत आहेत. मात्र, गूळ बाजारपेठेत ही मागणी पूर्ण होताना दिसत आहे. गुऱ्हाळांची संख्या घटल्याने उत्पादन खालावले आहे. परिणामी दरवाढ झाल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत गुळाला चार हजार ते ४ हजार ८०० रुपये क्विंटल दर मिळत आहे. तर साखरेचा घाऊक दर सरासरी ३७ रुपयेच राहिला. परिणाम राज्यात गुळ पावडर करणाऱ्या कारखान्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढते आहे.
सद्यस्थितीत गूळ पावडरची अधिकाधिक विक्री उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू या राज्यात होते. साधारणत: मद्य निर्मितीमध्येही गुळ पावडर वापरली जाते. गेल्या १५ वर्षात गुळ विक्री घसरली असल्याचे व्यापारी सांगातात. मात्र, दर तेजीत आहेत. गुळ खाण्याचे प्रमाण मात्र दिवसेदिवस घटते आहे. जेवढी गुळ पावडर बनते त्याचेही खाण्याचे प्रमाण कमी आहे. बहुतांश गुळ मद्य निर्मितीमध्ये वापरला जातो. त्याचे दर या वर्षी ४८ रुपयांपर्यंत वधारलेले होते. किरकोळ बाजारात तर तो ७० ते ८० रुपये किलोपर्यंत गुळ विक्री होतो. गुळ पावडर उत्पादक मात्र पावडरचा दर २ हजार ७०० ते ३ हजार २०० रुपयांपर्यंत राहिल्याने या वर्षी हे कारखानेही अडचणीमध्येच असल्याचे सांगतात.

















