पुणे: महाराष्ट्र सरकारने 2023 मध्ये स्थापन केलेल्या राज्यस्तरीय समितीचे पुनर्गठन केले आहे. ही समिती बीड जिल्ह्यात उघडकीस आलेल्या महिला ऊसतोड कामगारांवरील अनावश्यक हिस्टरेक्टॉमी (गर्भाशय काढण्याच्या) रॅकेटची चौकशी करत होती. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोरे यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले कि, जिल्हास्तरीय समित्यांच्या कार्यक्षेत्राची व्याख्या लवकरात लवकर निश्चित केली जाईल, जेणेकरून राज्यस्तरीय समिती अधिक वेगाने आणि प्रभावीपणे काम करू शकेल. मागील तीन वर्षांत राज्यातील खासगी रुग्णालयांमध्ये महिला ऊसतोड कामगारांवर अनावश्यक हिस्टरेक्टॉमी शस्त्रक्रिया झाल्या का, याची चौकशी जिल्हास्तरीय समित्या करतील.
त्या पुढे म्हणाल्या कि, “2023 मध्ये बीड जिल्ह्यात महिला ऊसतोड कामगारांचे गर्भाशय काढण्याशी संबंधित एक रॅकेट समोर आले होते. त्यावेळी एक राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती, ज्याचे आता पुनर्गठन करण्यात आले आहे. अशा अनावश्यक शस्त्रक्रिया रोखण्यासाठी उपाययोजना सुचविणे आणि समितीच्या कामकाजासाठी वार्षिक आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.” आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कांडेवाड यांनी सांगितले, “विभागाने सुमारे एक लाख महिला ऊसतोड कामगारांना आरोग्य सेवा पुरविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांच्या सोबत सुमारे 5,000 मुलेही असतात, जी राज्यातील 17 जिल्ह्यांतून ऊसतोडीसाठी स्थलांतर करतात. मुलांच्या आरोग्य व शिक्षणासह महिलांना मासिक पाळी स्वच्छतेची साधने आणि सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्याबाबत उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येणार आहे.”


















