पुणे : ऊस गळीत हंगामामध्ये तोडणी मजूर पुरवण्याचे आमिष दाखवून ऊस वाहतूकदार शेतकऱ्याची तब्बल १२ लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सुधीर शिवाजी जाधव (वय ५०, रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी जालना जिल्ह्यातील शेषराव गोपीनाथ जाधव, कार्तिक शेषराव जाधव आणि सुंदर उत्तमराव जाधव (सर्व रा. वंजारवाडी, ता. बदनापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पराग अॅग्रो फूड्स अँड अलाइड प्रॉडक्ट्स प्रा.लि. साखर कारखान्याशी लेखी करार असल्याचे भासवून संशयितांनी फसवणूक केल्याचे जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी सुधीर जाधव यांचा साखर कारखान्यांना ऊस पुरवण्याचा व्यवसाय आहे. २०२५-२६ च्या गाळप हंगामासाठी संशयित शेषराव जाधव, कार्तिक व सुंदर जाधव यांनी त्यांना पराग अॅग्रो फूड्सशी करार झाल्याचे भासवले. मजूर पुरवण्याचे आश्वासन देऊन संशयितांनी त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने १२ लाख ६७ हजार रुपये बँक खात्यावर घेतले. पैसे घेऊनही मजूर उपलब्ध करून न देता संगनमताने फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरूर पोलिसांनी या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

















