पुणे : भवानीनगर येथे श्री छत्रपती कारखान्याच्या परिसरात उसाची वाहने उभा करण्याचा यार्ड जगगुरू संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला कारखाना आहे. त्यामुळे गाळप हंगाम सुरू असताना उसाच्या वाहनांना पालखी महामार्ग ओलांडावा लागतो. या वाहनांसाठी अंडरपास हा पुरेसा नसून या ठिकाणी पालखी महामार्ग जमिनीलगत असावा किंवा हा मार्ग वाय ब्रिजवरून गेला पाहिजे. त्यामुळे ऊस वाहतुकीला अडचण येणार नाही अशा पद्धतीने पालखी महामार्गाचे काम करावे, असे मत कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी व्यक्त केले. संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा करताना व्यक्त केले. कारखाना परिसरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाची आणि येथून जाणाऱ्या पालखी महामार्गाची पाहणी जाचक यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदारांनी केली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी कारखान्यासमोरून उसाच्या वाहनांसाठी पालखी महामार्गाच्या खाली जागा रिकामी राहावी, कारखान्याच्या पाठीमागून पालखी महामार्गाचे नियोजन झाले पाहिजे अशी सूचना जाचक यांनी केली. काँक्रिटीकरण झाल्यानंतर एसटी स्टँडपासून भवानीमातेच्या मंदिरापर्यंत व्यापार पेठेतील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पेवर ब्लॉक बसवावेत, अशी अपेक्षा जाचक यांनी व्यक्त केली. उपाध्यक्ष कैलास गावडे, संचालक शिवाजीराव निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, रामचंद्र निंबाळकर, गणपतराव कदम, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, अशोकराव पाटील, मंथन कांबळे, सतीश देवकाते, तानाजी शिंदे, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, सुचिता सचिन सपकळ, माधुरी सागर राजपुरे, जनरल मॅनेजर हनुमंत करवर आदी उपस्थित होते.


















