छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांच्या ज्वारी, मका यांसारख्या पिकांवर प्रक्रिया करून इथेनॉलनिर्मिती वाढवावी आणि देशात इथेनॉलवर चालणारी वाहने प्रोत्साहित करावीत. यामुळे शेतमालाला चांगला बाजारभाव मिळून शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी येईल, असे मत आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. ते शिरूर अनंतपाळ तालुक्यातील धामणगाव येथे रयत क्रांती संघटनेच्या वतीने आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच ज्ञानोबा बोळंगे होते. खोत म्हणाले की, शेतकऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी संघटित होऊन लढा उभारणे आवश्यक आहे. ज्या शेतकरी कुटुंबात नोकरी करणारा कोणी नाही, अशा कुटुंबांना दरमहा २५ हजार रुपयांची मदत देण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ऊस बिल व्याजासह देण्याची रयत क्रांती संघटनेची मागणी
गाळप हंगाम २०२५-२६ चे थकीत ऊस बिल व्याजासह देण्याच्या मागणीचे निवेदन रयत क्रांती संघटना मराठवाडा यांच्या वतीने आमदार सदाभाऊ खोत यांना नांदेड येथे देण्यात आले. सचिन घायाळ शुगर प्रा.लि. संचलित संत एकनाथ सहकारी साखर कारखाना लिमिटेड एकनाथ नगर पैठण या कारखान्याला गाळप हंगाम २०२५ २६ मध्ये ऊस दिला आहे. मात्र अद्याप पर्यंत उसाचे बिल मिळाले नाही ते व्याजासहित ऊस बिले न मिळाल्यास रयत क्रांती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.


















