नाशिक : ‘केजीएस शुगर’कडून ऊस उत्पादकांना ६.३६ कोटींची थकीत देणी अदा, शेतकऱ्यांना दिलासा

नाशिक : अनेक वर्षांच्या आर्थिक अडचणींमुळे बंद पडण्याच्या स्थितीत असलेल्या केजीएस शुगरचे ग्रेनॉच इंडस्ट्रीज लिमिटेडच्या माध्यमातून पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. केजीएस शुगरच्या या पुनरुज्जीवन प्रक्रियेत राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (एनसीएलटी) आराखड्यानुसार शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलांपोटी ६ कोटी ३६ लाख रुपयांची शंभर टक्के रक्कम ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२५ मध्ये अदा करण्यात आली आहे. आता बुधवारी (ता. १८) दुपारी एक वाजता कारखाना परिसरात जुन्या यादीत समावेश न झालेल्या आणखी १३५ शेतकऱ्यांना सुमारे एक कोटी १५ लाख रुपये स्वखर्चाने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे, पोलिस उपअधीक्षक कांतिलाल पाटील, तहसीलदार विशाल नाईकवाडे, सायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आहेरवाड तसेच कारखान्याचे संचालक व अधिकारी यावेळी उपस्थित राहतील.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवत व्यवस्थापनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे असे कारखान्याचे अध्यक्ष संजय होळकर यांनी सांगितले. केजीएस शुगरच्या पुनरुज्जीवन आराखड्यात देय असलेल्या १७० कोटींच्या रकमेतून सहा कोटी ३६ लाख रुपये शेतकऱ्यांच्या थकीत ऊस देयकांसाठी वर्ग करण्याचा प्रस्ताव व्यवस्थापनाने ‘एनसीएलटी’ समोर मांडला होता. त्याला मंजुरी मिळवून ही रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली. १८ नोव्हेंबर २०१८ पूर्वी माहिती सादर न झाल्याने १३५ शेतकऱ्यांची नावे यादीत समाविष्ट झाली नव्हती. मात्र, या शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन होळकर कुटुंबीयांनी सुमारे १.१५ कोटी रुपये अतिरिक्त स्वरूपात स्वखचनिने देण्याचा निर्णय घेतला. आता शेतकऱ्यांचाही विश्वास संपादन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे विद्यमान तसेच थकीत ऊस देयके असलेल्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊस लागवड करून केजीएस शुगरला ऊसपुरवठा करावा आणि कारखान्याच्या पुनरुज्जीवनाला सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष होळकर यांनी केले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here