सातारा : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक मे-जून महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत सत्ताधारी गटाकडून कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांचे पुत्र आमदार डॉ. अतुल भोसले, तर विरोधी माजी अध्यक्ष अविनाश मोहिते गटाकडून मोहिते यांच्या पत्नी अर्चना मोहिते हे दोन नवे चेहरे रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे. रेठरे बुद्रूक गटातूनच ही लढत होईल अशी शक्यता आहे. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांच्या गटाला माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या गटाने आव्हान देण्याची तयारी ठेवली आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय गणिते महत्त्वाची ठरणार आहेत. कारखान्याच्या निवडणुकीत सहा विधानसभा मतदारसंघांचा अंतर्भाव आहे.
कृष्णा कारखान्याचे कऱ्हाड व सांगली जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव, शिराळा, पलूस तसेच खानापूर तालुक्यात सुमारे ५० हजार सभासद आहेत. यामधील सर्वाधिक सभासद कऱ्हाड तालुक्यात आहेत. आमदार डॉ. अतुल भोसले यांनी वाआधी २००५ च्या निवडणुकीत उमेदवारी घेत कौल आजमावला होता. मात्र, त्यावेळेस त्यांना यश आले नाही. आगामी निवडणुकीत उमेदवारी घेऊन साखर लॉबीमध्ये एन्ट्री करत वाद्वारे राज्याच्या साखर उद्योगाच्या संबंधित शिखर संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करतील, असे वाटते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचा असणारा स्नेह लक्षात घेता आमदार भोसले यांना ही संधी पोषक ठरू शकते. तर अर्चना मोहिते या जिल्हा परिषदेचे माजी सभापती देवराज पाटील यांच्या भगिनी आहेत. त्याचबरोबर त्या कोल्हापूरचे आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या नातलग आहेत. यातूनच आमदार जयंत पाटील यांना त्यांच्या पॅनेलला साथ देण्यासाठी विनंती करू शकतात, अशीही चर्चा आहे.


















