छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथील एका शेतकऱ्याची ऊसतोडणीसाठी मजूर पुरवण्याचे आमिष दाखवत १२ लाख १८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विलास लक्ष्मण पवार (५७, रा. नेवरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित बापू सदा सोनवणे व अनिल सदा सोनवणे (दोघेही रा. नळदण, ता. मालेगाव, जि. नाशिक) यांच्याविरोधात फिर्याद दाखल झाली आहे. संशयितांनी ३६ मजूर पुरविण्याचे आमिष दाखवले. नोटरी करारनामा करूनही मजूर पुरविण्यात न आल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार यांनी वेळोवेळी बँक चेक, आरटीजीएस आणि फोन पेच्या माध्यमातून एकूण १२ लाख १८ हजार रुपये संशयितांच्या खात्यावर वर्ग केले. संशयितांनी ३६ मजूर पुरवण्याचे आश्वासन देत नोटरी करारनामा केला होता. मात्र १ नोव्हेंबर २०२५ पासून काम सुरू न करता संशयितांनी संपर्क तोडला. पवार यांनी चौकशी केली असता घराला कुलूप आढळले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक औदुंबर म्हस्के पुढील तपास करत आहेत.


















