जालना : अंबड व घनसावंगी तालुक्यांतील सर्व साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाने सध्याच्या दुष्काळी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन ऊस तोडणीचे नियोजन करताना दुष्काळी भागातील वाळत असलेल्या उसाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दोन्ही तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्याप पाण्याची तीव्र टंचाई असून, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठला असून, पाण्याअभावी ऊसपीक अक्षरशः वाळण्याच्या मार्गावर आहे. ज्या भागात पाण्याची सोय नाही आणि ऊस वाळत आहे, त्या भागातील उसाची तोडणी प्रथम करून शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सर्व साखर कारखान्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी डॉ. रामकिसन जाधव यांच्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
अंबड व घनसावंगी तालुक्यांतील काही भागांत सध्या कॅनॉलद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र कॅनॉलपासून दूर असलेल्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पाण्याची पुरेशी सोय उपलब्ध नाही. त्यामुळे या भागातील ऊसपीक जगविणे शेतकऱ्यांसाठी कठीण झाले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आणि आर्थिक खर्च करून ऊसपीक उभे केले आहे. मात्र, पाण्याअभावी हे पीक हातातून जाण्याची वेळ आली आहे. पाण्याअभावी वाळत असलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी कारखान्यांनी सहकार्य करावे. अशा भागातील शेतकऱ्यांचा ऊस तातडीने तोडून कारखान्याला न्यावा, अशी मागणी केली जात आहे.


















