बेळगाव : येथील एस. निजलिंगप्पा साखर संस्थेत बुधवारी ‘साखर कारखान्यांमधील अन्न सुरक्षा व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित प्रशिक्षण कार्यशाळा झाली. यावेळी संस्थेचे संचालक राजगोपाल यांनी मार्गदर्शन केले. साखर उद्योग केवळ उत्पादन आणि नफ्यापुरता मर्यादित न ठेवता अन्नसुरक्षा आणि गुणवत्तेच्या निकषांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे. साखर हा दैनंदिन आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून, तिचा दर्जा सातत्याने उच्च राखणे ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमात व्याख्याते मरुळसिद्धप्पा यांनी अन्नसुरक्षा व्यवस्थापनाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी साखर कारखान्यांच्या जबाबदाऱ्या अधोरेखित केल्या. मूल्यवर्धित साखरेचे उत्पादन केल्यास आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत बाजारपेठेत स्पर्धात्मकता वाढून अधिक दर मिळू शकतो. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि गुणवत्ता नियंत्रणाची कडक अंमलबजावणी आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी तांत्रिक सल्लागार सी. बी. पाटील, महांतेश सारापुरे, वृषभ अस्की यांच्यासह अधिकारी, तंत्रज्ञ आणि कर्मचारी उपस्थित होते.


















