महाराष्ट्राच्या ऊसदराचा कर्नाटकला फटका; सीमाभागातील ऊस महाराष्ट्राकडे, कर्नाटकातील कारखान्यांकडून दरवाढीचा सपाटा!

कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडून प्रतिटन ३,९०० रुपये दर दिला जात असल्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कल महाराष्ट्रातील कारखान्यांकडे वाढला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ऊसदरात प्रतिटन सुमारे ३०० रुपयांची तफावत निर्माण झाल्याने कर्नाटकातील साखर कारखान्यांसमोर ऊस मिळवण्याचे आव्हान उभे राहिले आहे. परिणामी, शेतकऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कर्नाटकातील कारखान्यांनी दरवाढीचा सपाटा सुरू केला आहे.

महाराष्ट्राकडे जाणारा ऊस रोखण्यासाठी कर्नाटक सीमाभागातील कारखान्यांनी अवघ्या काही दिवसांत तीन वेळा दरवाढ केली आहे. सुरुवातीला प्रतिटन ३,६०० रुपये असलेला दर आता ३,८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दिवाळीच्या काळात कर्नाटकातील ऊसदराचा तिढा प्रतिटन ३,६०० रुपयांच्या पहिल्या उचलीवर सुटला होता. दुसरीकडे, दक्षिण महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी प्रतिटन ३,९०० रुपये पहिली उचल देण्याचे मान्य केले. तसेच हंगाम संपण्यापूर्वी १०० रुपये आणि हंगाम संपल्यानंतर साखरेचे दर कायम राहिल्यास आणखी २०० रुपये देण्याचे सूत्र निश्चित करून ऊसतोडणी सुरू केली.

ChiniMandi WhatsApp Channel

कर्नाटकातील काही कारखान्यांनी सुरुवातीला प्रतिटन ३,६०० रुपये दराने ऊसखरेदीचे करार केले होते. मात्र, महाराष्ट्रातील कारखान्यांकडून सुमारे ३,९०० रुपये दर मिळत असल्याने सीमाभागातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्राला ऊस पाठवण्यास पसंती दिली. त्यामुळे कर्नाटकातील कारखान्यांसमोर गाळपासाठी पुरेसा ऊस उपलब्ध करण्याचा प्रश्न निर्माण झाला. परिणामी, कारखान्यांनी पहिल्यांदा ३,६०० रुपयांवरून ३,७५० रुपये आणि त्यानंतर ३,८०० रुपये प्रतिटन दर जाहीर केला.

यापूर्वी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील काही कारखान्यांनी प्रतिटन ३,५५० रुपयांपेक्षा अधिक दर देणे शक्य नसल्याची भूमिका घेतली होती. मात्र, ऊसटंचाईची परिस्थिती निर्माण होताच त्यांना दरवाढीचा निर्णय घ्यावा लागला. काही कारखान्यांनी पहिल्या हप्त्यात ३०० रुपयांची वाढ देण्याची तयारी दर्शवली आहे. तर दुसऱ्या हप्त्याबाबत काही कारखाने १०० रुपये, तर काही ५० ते ५५ रुपयांची वाढ देण्याबाबत चर्चा करत आहेत. अद्याप अंतिम दराबाबत सर्व कारखान्यांमध्ये एकमत झालेले नाही. मात्र, ऊसाची संभाव्य टंचाई लक्षात घेता आगामी काळात कर्नाटकातील कारखान्यांना आणखी दरवाढ करावी लागण्याची शक्यता आहे.

सीमाभागातील ऊस महाराष्ट्राच्या कारखान्यांकडे

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील अनेक गावांमधील ऊस सध्या महाराष्ट्रातील कारखान्यांकडे जात असल्याचे चित्र आहे. गावांमधील ऊसक्षेत्र मर्यादित असतानाही महाराष्ट्रातील विविध कारखान्यांची ऊसतोडणी यंत्रणा या भागात दाखल झाली आहे. महाराष्ट्रातील कारखान्यांचे तोडणी कामगार आणि यंत्रसामग्री सीमाभागात सक्रिय झाल्याने कर्नाटकातील कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊसही महाराष्ट्राकडे वळत आहे.

महाराष्ट्रातील कारखान्यांकडून मिळणारा तुलनेने अधिक दर, ऊसतोडणीसाठी उपलब्ध असलेली यंत्रणा आणि वेळेत बिले मिळण्याची अपेक्षा यामुळे कर्नाटकातील शेतकरी महाराष्ट्रातील कारखान्यांना प्राधान्य देत आहेत. कर्नाटकातील काही कारखान्यांकडून दुसरे आणि तिसरे बिल वेळेत मिळेल की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कारखान्यांवरील विश्वास वाढत असल्याचे सीमाभागातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ऊस मिळवण्यासाठी कारखान्यांमध्ये स्पर्धा

कर्नाटकातील कारखान्यांनी गाळप हंगामाची सुरुवात तुलनेने सावकाश केली असली, तरी आता ऊस मिळवण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील कारखान्यांचा अधिक दर आणि सक्षम ऊसतोडणी यंत्रणा यामुळे कर्नाटकातील कारखान्यांना आपले पारंपरिक ऊस कार्यक्षेत्र टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी त्यांना सातत्याने दरवाढ करावी लागत आहे.

आगामी काळात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ऊसदराची स्पर्धा आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. गाळपासाठी पुरेसा ऊस उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्रातील कारखान्यांच्या दराशी बरोबरी करण्याबाबत विचार सुरू असल्याचे कर्नाटकातील कारखाना प्रतिनिधींनी सांगितले. त्यामुळे सीमाभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दराबाबत आगामी काळात आणखी महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here