सातारा : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कारखान्यापैकी एक असणाऱ्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पूर्व प्रक्रिया सुरू झाली आहे. कारखान्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती दाखल करण्याच्या मुदतीत केवळ एकच हरकत दाखल झाली आहे. या हरकतीवर गुरूवारी सुनावणी झाली असून आता बुधवार, २९ एप्रिलला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळेच या निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
७ एप्रिलला कृष्णा कारखान्याची मतदार यादी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर ही यादी प्रादेशिक सहसंचालक शिवाजीनगर साखर संकुल कार्यालय पुणे, कृष्णा कारखाना कार्यस्थळ रेठरे बुद्रुक, कराड – वाळवा कडेगाव उपनिबंधक कार्यालय आणि कराड तहसील कार्यालय या सहा ठिकाणी सभासदांना मतदार यादी पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती.५० हजाराहून अधिक सभासद संख्या झाली असून ९ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत प्रादेशिक सहसंचालक पुणे विभागीय कार्यालयात या हरकती व सूचना दाखल कराव्यात, असे आवाहन करण्यात आले होते.
या कालावधीत रेठरे खुर्द येथील बापूसाहेब व्यंकटराव साळुंखे यांनीच एकमेव हरकत दाखल केली होती. या हरकतीवर गुरूवार, २३ एप्रिलला प्रादेशिक सहसंचालक साखर पुणे विभाग पुणे निलिमा गायकवाड यांच्यापुढे सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता २९ एप्रिलला या सुनावणीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे मे महिन्यात कृष्णा कारखान्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल अशीच चिन्हे आहेत. तसेच अंतिम मतदार यादी झाल्यानंतर काही दिवसांमध्येच प्रत्यक्ष निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल ,असे बोलले जात आहे.


















