सातारा : खंडाळा तालुका शेतकरी सहकारी कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न होत असताना, एका गटाकडून निवडणूक व्हावी, असे प्रयत्न सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाच जागांचा प्रस्ताव मिळाल्यानंतर भाजपमध्ये एकवाक्यता न राहिल्याने आणि कारखान्याची परिस्थिती पाहता भाजपच्या शंकरराव गाढवे, अनिरुद्ध गाढवे, हृषीकेश धायगुडे, बापूराव धायगुडे आणि अतुल पवार यांनी सर्व उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. ही निवडणूक बिनविरोध झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
म्हावशी येथील खंडाळा तालुका शेतकरी साखरकारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, गुरुवारी भाजपने १४ अर्ज मागे घेतल्याने, त्यामुळे सर्व २१ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले. त्यामध्ये विद्यमान व्हाइस चेअरमनचाही समावेश आहे. कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यानंतर घडामोडींना वेग आला. निवडणुकीबाबत एकवाक्यता न झाल्याने भाजपकडून अर्ज माघारीचा निर्णय घेण्यात आला. दरम्य़ान, निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आता तज्ज्ञ संचालकपदी कोणाची वर्णी लागणार, याची चर्चा सुरू झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार तज्ज्ञ संचालकपदी मंत्री मकरंद पाटील आणि लेखापरीक्षक प्रवीण गाढवे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.


















