बीड : आष्टी तालुक्यातील कडा येथील महेश सहकारी साखर कारखान्यातून तब्बल २५ लाख ३५ हजार रुपयांचे यंत्रसामग्रीचे सुटे भाग चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. कारखाना दीर्घकाळ बंद असल्याने तो बँकेच्या ताब्यात होता; मात्र लायसन्स रिस्टोर झाल्यानंतर दुरुस्तीच्या कामावेळी ही चोरी उघडकीस आली.
मिल क्रमांक १ ते ४ मधील मास्टर गिअर, रोलर, तांब्याची वायर, इलेक्ट्रिक मोटर्स आणि ७०० फूट लांबीची चेन कॅरिअर अशी महागडी सामग्री चोरट्यांनी लंपास केली आहे. कारखान्याचे लेबर ऑफिसर संतोष टाकळे यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. सुरक्षा रक्षक तैनात असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


















