सोलापूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर अखंड हरिनाम सप्ताह, काल्याचे कीर्तन

सोलापूर: श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर दि. १८ ते २४ एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व महिला मंडळ भजनाचे आयोजन केले होते. अखंड हरिनाम सप्ताहाचा सांगता समारंभ उत्साहात पार पडला. यासाठी चेअरमन, आमदार अभिजित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कारखान्यात श्री विठ्ठल रुक्मिणी, श्रीराम-लक्ष्मण सीता, मारुती या देवतांची अक्षयतृतीयेला प्राणप्रतिष्ठा केल्याचे औचित्य साधून याचे आयोजन केले होते. या सप्ताहाची सांगता दिंडी नगर प्रदक्षिणा व ह.भ.प. एकनाथ महाराज हांडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.

हरिनाम सप्ताहाच्या सांगता समारंभ प्रसंगी आमदार अभिजित पाटील यांनी हा २५वा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा असून यासाठी कारखान्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले असल्याचे सांगितले. सप्ताहात हभप प्रा. तुकाराम महाराज मस्के व हभप आण्णा महाराज भुसनर यांचे नेतृत्वात पहाटे ४ ते ६ काकडा, स. १० ते १२ संत तुकाराम महाराज गाथा भजन, दु. ३.३० ते ५.३० महिला भजन, सायं. ५.३० ते ६.३० हरीपाठ, सायं. ७ ते रात्री ९ किर्तन व रात्री ११ ते ४ हरिजागर याप्रमाणे दैनंदिन कार्यक्रमांचे आयोजन केले होते. दिंडी नगरप्रदक्षिणामध्ये प्रशालेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आकर्षक वेशभूषा परिधान केली होती. संचालक मंडळ, कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड, सभासद, अधिकारी, कर्मचारी, कामगार, भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक तुकाराम मस्के यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here