साखरेचे दर स्थिर ठेवण्यावर केंद्राचा भर, मे महिन्यासाठी २२.५ लाख टन कोटा जाहीर

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने मे महिन्यासाठी २२.५ लाख टन साखरेचा कोटा जाहीर केला आहे. सध्या देशातील बहुतांश साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपत आला असून अनेक कारखाने बंद होण्याच्या टप्प्यावर आहेत. सामान्यतः एप्रिल-मे या काळात साखरेची मागणी उच्चांकी असते. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेचे दर नियंत्रणात ठेवत पुरवठ्याचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे दिसते. एप्रिलच्या तुलनेत हा कोटा कमी ठेवण्यात आल्याने साखरेचे दर ठराविक मर्यादित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गेल्या वर्षी मे २०२५ मध्ये २३.५ लाख टन साखरेचा कोटा जाहीर करण्यात आला होता. त्या तुलनेत यंदाचा कोटा १ लाख टनांनी कमी आहे. उत्पादन अधिक असतानाही दरवाढ नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ही धोरणात्मक भूमिका घेतल्याचे संकेत मिळत आहेत. अशा पार्श्वभूमीवर साखरेचा साठा व बाजारातील उपलब्धता यावर केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे. सरकारने सावध भूमिका घेत कोटा मर्यादित ठेवला आहे. पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीचा मागणीवर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे बाजार तज्ज्ञांचे मत आहे. मे महिन्याचा कोटा देशांतर्गत गरजा भागविण्यास पुरेसा असल्याचे केंद्रीय सूत्रांनी दैनिक ‘सकाळ’ला सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here