नवी दिल्ली : गाळप हंगाम 2025–26 दरम्यान देशातील एकूण साखर उत्पादन 30 एप्रिलपर्यंत 275.28 लाख टनांवर पोहोचले आहे, अशी माहिती इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) ने दिली आहे. हे उत्पादन मागील वर्षी याच कालावधीत झालेल्या 256.49 लाख टनांच्या तुलनेत सुमारे 7 टक्क्यांनी अधिक आहे. सध्या देशात केवळ 5 साखर कारखाने सुरु आहेत, तर मागील हंगामात याच तारखेला 19 कारखाने सुरू होते. उत्तर प्रदेशमध्ये या हंगामात 89.65 लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, मागील वर्षी हे उत्पादन 92.40 लाख टन होते. यावर्षी राज्यातील सर्व साखर कारखाने बंद झाले आहेत, तर मागील वर्षी याच वेळी 10 कारखाने सुरू होते.
महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये अनुक्रमे 99.2 लाख टन आणि 48.01 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. मागील वर्षी याच कालावधीत हे उत्पादन अनुक्रमे 80.93 लाख टन आणि 40.40 लाख टन होते. या दोन्ही राज्यांमध्ये मुख्य हंगामासाठी सर्व साखर कारखाने बंद झाले आहेत. मात्र, कर्नाटकातील काही कारखाने जून/जुलै 2026 पासून विशेष हंगामात पुन्हा सुरू होणार आहेत. तसेच, तामिळनाडूमधील काही साखर कारखानेही विशेष हंगामात कार्यरत राहणार आहेत. कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांतील विशेष हंगामातून एकत्रितपणे साधारणपणे 5 लाख टन साखरेचे उत्पादन होते.


















