नवी दिल्ली : देशात 2026-27 चा साखर गळीत हंगाम वेगाने सुरू असून, 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत देशभरातील 313 साखर कारखान्यांनी ऊस गाळप सुरू केले आहे. मागील वर्षी याच कालावधीत 311 कारखाने सुरू होते, अशी माहिती भारतीय साखर व जैवऊर्जा उत्पादक संघटनेने (ISMA) प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.ISMA चे महासंचालक दीपक बल्लानी यांनी सांगितले की, चालू हंगामात आतापर्यंत 23.59 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. मागील वर्षी याच कालावधीत 11.49 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा उत्पादनात झालेल्या वाढीचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्रात ऊस गाळपाला लवकर झालेली सुरुवात. राज्यात यंदा 154 कारखान्यांनी गाळप सुरू केले असून, मागील वर्षी याच काळात 132 कारखाने सुरू होते.
ते म्हणाले की, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्येही ऊस गाळपाची गती हळूहळू वाढत आहे. येत्या काही दिवसांत आणखी कारखाने सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये गाळपाचा वेग आणखी वाढेल.देशभरात नवीन साखर उत्पादन बाजारात येत असल्याने देशांतर्गत साखरेची उपलब्धता समाधानकारक आहे. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासह बाजारात पुरेसा साखर पुरवठा राखण्याची उद्योगाची क्षमता असल्याचे बल्लानी यांनी स्पष्ट केले.
NFCSF च्या आकडेवारीनुसार 24.21 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या (NFCSF) आकडेवारीनुसार, 15 नोव्हेंबरपर्यंत देशातील साखर उत्पादन 55 टक्क्यांनी वाढून 24.21 लाख मेट्रिक टनांवर पोहोचले आहे. महाराष्ट्रात लवकर आणि वेगाने सुरू झालेल्या ऊस गाळपाचा या वाढीत मोठा वाटा आहे.महासंघाच्या राज्यनिहाय गाळप अहवालानुसार, देशभरातील कारखान्यांनी आतापर्यंत 290.53 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. मागील वर्षी याच कालावधीत 200.90 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. यंदा गाळपात 44.61 टक्क्यांची वाढ झाली आहे. देशाचा सरासरी साखर उतारा मागील वर्षीच्या 7.75 टक्क्यांवरून वाढून 8.33 टक्के झाला आहे. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सुरू असलेल्या कारखान्यांची संख्या कमी आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत 314 कारखाने सुरू होते, तर मागील वर्षी याच कालावधीत 342 कारखाने सुरू होते. म्हणजेच कारखान्यांच्या संख्येत 28 ने, अर्थात 8.19 टक्क्यांनी घट झाली आहे.
महाराष्ट्रात साखर उत्पादनात मोठी वाढ
महाराष्ट्रात 15 नोव्हेंबरपर्यंत 18.75 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. मागील वर्षी याच कालावधीत 7.95 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले होते.राज्यातील 155 कारखान्यांनी आतापर्यंत 216.76 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. मागील हंगामातील 103.25 लाख मेट्रिक टन गाळपाच्या तुलनेत ही वाढ दुपटीपेक्षा अधिक आहे.राज्याचा सरासरी साखर उतारा 8.65 टक्के नोंदवण्यात आला असून, मागील वर्षी तो 7.70 टक्के होता. मागील हंगामात याच कालावधीत महाराष्ट्रातील 168 कारखाने सुरू होते.
उत्तर प्रदेशात गाळपाचा वेग मागील वर्षापेक्षा कमी
उत्तर प्रदेशात यंदा ऊस गाळप आणि साखर उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे. अहवालानुसार, राज्यातील 75 कारखान्यांनी आतापर्यंत 17.34 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून 1.50 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले आहे.मागील वर्षी याच कालावधीत 86 कारखान्यांनी 40 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून 3.50 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले होते. राज्याचा साखर उताराही मागील वर्षीच्या 8.75 टक्क्यांवरून घटून 8.65 टक्के झाला आहे.
कर्नाटकात 60 कारखान्यांकडून 31.43 लाख मेट्रिक टन गाळप
कर्नाटकात 60 कारखान्यांनी 31.43 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून 2.20 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले आहे. राज्याचा साखर उतारा 7 टक्के आहे.मागील वर्षी याच कालावधीत कर्नाटकातील 65 कारखान्यांनी 34.51 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून 2.45 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले होते.गुजरातमधील 12 कारखान्यांनी 13.49 लाख मेट्रिक टन उसाच्या गाळपातून 0.85 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले आहे. मागील वर्षी 18.31 लाख मेट्रिक टन उसाच्या गाळपातून 1.30 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले होते.
तमिळनाडू, तेलंगणा आणि उत्तराखंडमध्येही गाळप सुरू
तमिळनाडूमध्ये सहा कारखान्यांनी 8.24 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून 0.70 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले आहे. मागील हंगामात चार कारखान्यांनी 0.25 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले होते.तेलंगणात आतापर्यंत 0.10 लाख मेट्रिक टन, तर उत्तराखंडमध्ये 0.11 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे.दरम्यान, आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश आणि पंजाबमधील साखर कारखान्यांनी अद्याप ऊस गाळप सुरू केलेले नाही.


















