धाराशिव : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेने थकीत कर्ज वसुलीसाठी काही दिवसांपूर्वीच तेरणा कारखान्यातील भंगार विक्रीचे टेंडर काढले होते. आता बँकेने कारखान्याकडील थकीत ३१५ कोटी रुपयांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी बँकेच्या ताब्यात असलेल्या ३७.५३ हेक्टर जमिनीच्या विक्रीस संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता दिल्याचे समजते. शेतकऱ्यांच्या मालकीचा हा सहकारी तत्वावरील कारखाना खाजगी कारखानदारास विक्री करण्याची बँकेची मानसिकता नाही. यातूनच ऑक्टोबर २०२१ मध्ये विक्रीऐवजी हा कारखाना भैरवनाथ शुगर्सला २५ वर्षाकरीता भाडेतत्वावर देण्यात येऊन शेतकऱ्यांची मालकी शाबूत राखण्यात आली. त्यावेळी भैरवनाथ शुगर्सकडून ॲडव्हान्सपोटी १७.७१ कोटी रुपये बँकेकडे जमा करण्यात आले. परंतु, यातील १७.४६ कोटी रुपये तर पीएफ फंड, वीजबील, एक्साईज ड्युटी व इतर देणे देण्यातच जिरले.
सद्यस्थितीत बँकेवर प्रशासक नेमण्याची टांगती तलवार आणि दुसरीकडे थकबाकीमुळे आर्थिक अडचण अशी विचित्र स्थिती डीसीसी बँकेची आहे. त्यामुळे आगामी काळात तेरणा कारखान्याकडे बँकेची ३१५ कोटी कर्जाची थकबाकी जमीन विक्री करण्याचा निर्णय झाला आहे. बँकेने तेरणा साखर कारखान्यास मागील काळात वेळोवेळी विविध स्वरूपात कर्जवाटप केलेले आहे. कर्जास शासनाची थकहमी असली तरी अगोदर कारखान्याची मालमत्ता विक्री करून उर्वरित रक्कम शासनाकडे मागा अशी भूमिका शासनाच्या अधिकाऱ्यांची आहे. कारखाना वगळून या परिसरातील कारखान्याकडून बँकेकडे गहाण ठेवण्यात आलेल्या जमीनीपैकी जवळपास ९३ एकर जमीन डीसीसी बँकेने विक्री करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. २० एप्रिल रोजी झालेल्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत विषय क्रमांक ७नुसार हा विषय चर्चेला घेऊन यास बहुमताने मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीस १० संचालक उपस्थित होते. यापैकी दोघांचा विरोध वगळता इतर संचालकांकडून या विक्रीस मंजुरी देण्यात आल्याचे कळते.


















