पुणे : राज्य सरकारकडून ‘यशवंत’च्या जमीन व्यवहाराला पुन्हा एकदा स्थगिती; व्यवहार अनिश्चिततेच्या भोवऱ्यात

पुणे : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत उपबाजार आवारासाठी खरेदी करण्याच्या प्रक्रियेला राज्य शासनाने पुन्हा एकदा स्थगिती दिली आहे. पणन संचालनालयाने काढलेल्या आदेशानुसार, पुढील आदेश येईपर्यंत जमीन खरेदीसंदर्भातील सर्व प्रशासकीय आणि आर्थिक कार्यवाही तात्काळ थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या व्यवहाराला स्थगिती दिली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी बाजार समितीने ४९.१८ एकर जमिनीचे खरेदीखत पूर्ण झाल्याचे जाहीर केले होते.

या व्यवहारापोटी बाजार समितीने कारखान्याच्या खात्यात ९६.६७ कोटी रुपये वर्ग केल्याची माहिती समोर आली होती. तसेच या जमिनीच्या खरेदीसाठी सुमारे ५० कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम कारखान्याला देणे अद्याप बाकी असल्याचेही समजते. मात्र, शासनाच्या नव्या आदेशामुळे संपूर्ण व्यवहार पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडला असून, पुढील प्रक्रिया नेमकी कोणत्या दिशेने जाईल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

उपबाजार आवार उभारण्यासाठी यशवंत सहकारी साखर कारखान्याची एकूण ९९.२७ एकर जमीन खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. या व्यवहारासाठी आवश्यक महसूल विभागाची मंजुरी, जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया तसेच इतर कायदेशीर बाबींवर आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री स्तरावर तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते.

दरम्यान, या जमीन व्यवहाराविरोधात शेतकरी सभासद कृती समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.कारखान्याची आर्थिक स्थिती, मालमत्तेचे मूल्यांकन आणि जमीन विक्री प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेवर न्यायालयात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे शासनाची नव्याने दिलेली स्थगिती आणि सुरू असलेली न्यायालयीन प्रक्रिया यामुळे यशवंत कारखान्याच्या जमीन व्यवहाराचा पेच आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने उपबाजार आवार उभारण्यासाठी मंजूर झालेल्या जमिनीपैकी पहिल्या टप्प्यातील ४४.१८ एकर जमिनीचे खरेदीखत १७ जून २०२६ रोजी पूर्ण केले होते. त्यानंतर उर्वरित जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू असतानाच शासनाने या व्यवहाराला स्थगिती दिली आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अवर सचिव माधवी शिंदे यांनी १३ जुलै रोजी पणन संचालकांना यासंदर्भात पत्र पाठविले होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्याच्या सहसंचालक (पणन) स्नेहा जोशी यांनी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि सचिव यांना लेखी आदेश जारी करून, यशवंत कारखान्याची ९९.२७ एकर जमीन खरेदीसंदर्भातील कोणतीही पुढील कार्यवाही पुढील आदेशापर्यंत न करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाने या जमीन खरेदीस मंजुरी दिली होती. त्यानुसार शासकीय मूल्यांकन, बाजारभावानुसार किंमत निश्चिती तसेच आवश्यक प्रशासकीय परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. मात्र, नव्या आदेशामुळे संपूर्ण व्यवहार सध्या स्थगित झाला आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here