कोल्हापूर : भोगावती कारखाना आर्थिक अरिष्ठात असल्याने गेल्या अनेक वर्षापासून कारखान्यावरील कर्जाचा वाढता बोजा कोणालाही कमी करता आलेला नाही. विस्तारीकरणापासून कर्जाचा डोंगर वाढतच गेला असून तो न पेलवणारा आहे. यंदाची आर्थिक स्थिती पाहता कारखाना मोठ्या संक्रमणातून जात आहे ही वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर संचालक मंडळाने कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात अंतर्गत विचार सुरू केल्याचे दैनिक ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले आहे. दरम्यान, कारखाना अडचणीत असताना संचालक मंडळावर दोन स्वीकृत आणि एक शासकीय तज्ज्ञ संचालक घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. विद्यमान संचालक मंडळाला न पेलवणारा भार आणखी दोन संचालक घेऊन काय साध्य होणार, याबाबत चर्चा रंगली आहे. सोमवारी या निवडीवर शिक्कामोर्तब होत आहे.
भोगावती साखर कारखाना चालवायला देण्याबाबत संचालक मंडळाच्या दोन बैठकांमध्ये चर्चाही झाली आहे. गेल्या बुधवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा विषय अजेंड्यावर होता. याबाबत अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील म्हणाले की, कारखाना भाडेतत्त्वावर किंवा चालविण्यास देण्याबाबत चर्चा आहे. मात्र, शासनाकडून साखरेला किमान विक्री दर वाढवून मिळण्याची व कर्जाचे पुनर्गठण होण्याची शक्यता असल्याने त्यावर पुनर्विचार करावा लागेल. तर शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जालंदर पाटील म्हणाले की, कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही वेळोवेळी आवाज उठविला. अखेर कारखाना चालवायला द्यायची वेळ आली आहे.


















