सांगली : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनीही कोल्हापूर पॅटर्ननुसार दर जाहीर करावेत, अशी मागणी स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली होती. यासाठी कारखानदारांना तीन दिवसांची मुदत दिली होती. मागणी मान्य न झाल्यास वजनकाटे बंद करून कारखान्यांची धुराडी बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. कारखानदारांनी स्वाभिमानीच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. सध्या कारखान्यांनी गाळप सुरू केले असून, ऊस दराचा प्रश्न मात्र बाजूलाच राहिला आहे. ऊस दराचा तिढा सोडविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणीही संघटनेने केली आहे. कोल्हापूरचा ऊसदर पॅटर्न सांगली जिल्ह्यातही लागू करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर कारखानदारांना तीन दिवसांची मुदत दिली होती. आता कारखानदार काय निर्णय घेणार आणि स्वाभिमानी संघटना आंदोलनाची दिशा काय ठरवणार, याकडे लक्ष लागले आहे.
सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती. त्या वेळी जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी आम्ही केवळ ‘एफआरपी’च देऊ, अशी भूमिका घेतली होती. कारखानदारांची ही भूमिका मान्य नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्पष्ट केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा यांनी सांगितले की, ४२०० रुपयांच्या दराचे सूत्र ठरले असताना जिल्ह्यातील एकाही कारखान्याने अधिकृत दर जाहीर केलेला नाही. सोमवारनंतर कोणत्याही क्षणी ऊस वाहतूक रोखून आंदोलन करणार आहे. त्यामुळे कारखानदारांनी आता आपली भूमिका लवकरात लवकर स्पष्ट करावी.

















