अहिल्यानगर : प्रवरा सहकार, औद्योगिक व शैक्षणिक समूहाच्या उभारणीत कामगारांचे योगदान अत्यंत मोलाचे असून प्रवरेचा कामगार हा आपल्या संस्थेचा अभिमान आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनी केले. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आयोजित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे, व्हा. चेअरमन सोपानराव शिरसाठ, ज्ञानदेव आहेर, कार्यकारी संचालक महेश कोनापुरे, संचालक मंडळ व कामगार उपस्थित होते.
म्हस्के पाटील म्हणाले, कोणतीही संस्था कामगारांच्या कष्टांवर उभी असते. सेवानिवृत्तीनंतरही आनंदी जीवन जगावे, सामाजिक कार्यात सहभागी व्हावे व कुटुंबाला वेळ द्यावा. डॉ. सुजय विखे यांनी सांगितले की, प्रवरेच्या वाटचालीत कामगारांचे योगदान निर्णायक राहिले असून त्यामुळेच ‘प्रवरा पॅटर्न’ला राज्यभर वेगळी ओळख मिळाली. साखर उद्योगासमोर अनेक आव्हाने असली तरी कामगारांच्या हिताला बाधा येऊ दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. आभार संचालक अशोक घोलप यांनी मानले.


















