अहिल्यानगर : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवर परिणाम झालेला असताना साखर कारखान्यांचा गाळप हंगाम ग्रामीण भागासाठी महत्त्वाचा ठरत आहे. कारखाने सुरू झाल्याने विविध भागांतून मोठ्या संख्येने ऊसतोड मजूर दाखल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नेवासा तालुक्यातील ज्ञानेश्वर, मुळा आणि स्वामी समर्थ यासह सहकारी व खासगी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेगाने सुरू झाला आहे. कारखाने सुरू होताच ऊसतोड मजूर, वाहतूकदार, ट्रॅक्टरचालक, बैलगाडीचालक आणि स्थानिक व्यावसायिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. ऊसतोडणी, आवश्यकता ऊस वाहतूक आणि संबंधित कामांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची असते. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना हंगामी रोजगार उपलब्ध होत आहे. ऊसतोड मजुरांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक बाजारपेठांमध्येही खरेदी विक्रीला चालना मिळत आहे.
ग्रामीण भागातील लहान दुकानदारांसाठी गाळप हंगाम हा व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचा काळ असतो. हंगामादरम्यान होणारी आर्थिक उलाढाल त्यांच्या दैनंदिन उत्पन्नाला आधार देते. त्यामुळे साखर कारखान्यांचा हंगाम हा केवळ साखर उत्पादनापुरता मर्यादित न राहता ग्रामीण भागातील विविध व्यवसायांना चालना देणारा ठरत आहे. चहा टपऱ्या, हॉटेल्स आणि साखर कारखान्यांच्या परिसरात तसेच ऊस वाहतुकीच्या मार्गावरील गावांमध्ये चहा टपऱ्या, हॉटेल्स, नाश्त्याची दुकाने, किराणा दुकाने आणि भाजीपाला विक्रेत्यांची वर्दळ वाढू लागली आहे. मजूर, वाहनचालक आणि वाहतूकदार यांच्यामुळे या व्यावसायिकांना ग्राहक मिळत आहेत. ऊस ऊसतोडणीसोबतच वाहतुकीचा व्यवसायही वेगाने सुरू झाला आहे. ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाड्या आणि अन्य वाहतूक साधनांच्या माध्यमातून कारखान्यांपर्यंत पोहोचविला जात आहे. यामुळे वाहनचालक, वाहतूकदार, वाहनमालक तसेच दुरुस्ती करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढल्याने डिझेल विक्री, टायर दुरुस्ती, गॅरेज, वेल्डिंग आणि वाहनांचे सुटे भाग विकणाऱ्यांचा व्यावसायिकही जोरात सुरू आहे.


















